तवसाळ ग्रामस्थ मंडळातर्फे
अरविंद सुर्वे यांचा सत्कार

गुहागर (प्रतिनिधी) : तवसाळ ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या अध्यक्षपदी अरविंद रामकृष्ण सुर्वे यांची एकमुखी निवड झाल्याने गुहागर तालुक्यातील तवसाळ गावी साजरा झालेल्या गणेश जयंती उत्सवात त्यांचा ग्रामस्थांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. “श्री देव स्वयंभू गजानन देवस्थान ट्रस्ट तवसाळ”चे अध्यक्ष मोहन यशवंत गडदे यांच्या हस्ते आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अरविंद सुर्वे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
गेले दीड-दोन वर्षे मुंबईच्या तवसाळ ग्रामस्थ मंडळाचा कारभार ठप्प झाल्यासारखा होता. मुंबईस्थित ग्रामस्थ मंडळी विखुरल्यासारखी झाली होती. काही मंडळींनी ज्येष्ठ पत्रकार अरविंद सुर्वे यांची भेट घेत ग्रामस्थांना एकत्र आणण्यासाठी साह्य करण्याची विनंती केली. त्यावेळी अरविंद सुर्वे यांनी त्यांना सर्वतोपरी साह्याचे आश्वासन देत बैठकीसाठी मंडळी जमली पाहिजे ही अट घातली. त्याप्रमाणे कोणाच्याही अधीन न राहता आपली मते समर्पकपणे मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याप्रमाणे १९ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या पहिल्याच बैठकीला मंडळी मोठ्या संख्येने जमा झाली. त्याच वेळी अरविंद सुर्वे यांनी ग्रामस्थांना एकीचे महत्त्व पटवून देत, पंतप्रधानांचा ‘एक है तो सेफ है’चा मंत्र दिला. त्या बैठकीत अरविंद सुर्वे यांनी अध्यक्षपदासाठी उपस्थितांमधील अनेक नावांचा पर्याय दिला. परंतु सामाजिक स्थान आणि संकटाशी सामना देत कार्यसिद्धीस नेण्याची क्षमता असलेल्या अरविंद सुर्वे यांचीच तवसाळ ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या अध्यक्षपदी एकमुखी निवड करण्यात आली.
गेली ४८ वर्षे पत्रकारितेत असलेले अरविंद सुर्वे हौशी रंगभूमीचे नाट्यकलाकर आहेत. १९९० पासून २०१८ पर्यंत हौशी रंगभूमीवर अभिनय केला आहे. १९९३ मध्ये त्यांची तवसाळच्या स्वयंभु गणेश मंदिराच्या जीर्णोद्धार समितीवर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वडिलांच्या जीवनावर आधारित “कल्पवृक्षांच्या छायेत” हे पुस्तक त्यांनी २००२ मध्ये लिहिले आहे. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे २०१५ मध्ये “दी पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी” पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. २०२२ मध्ये त्यांचा “कोरोनायोद्धा” पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या हस्ते २०२३ मध्ये त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. दीडशे वर्षांकडे वाटचाल असलेल्या “कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी” संस्थेच्या कार्यवाहपदी त्यांची २०२४ मध्ये निवड करण्यात आली. त्यानंतर वर्षभरात अनेक संकटांचा सामना करत सहकाऱ्यांच्या साह्याने त्यांनी “कित्ते भंडारी” संस्थेचा कारभार समर्थपणे सांभाळला आहे. अरविंद सुर्वे यांचा सामाजिक क्षेत्रातील एकूण दांडगा अनुभव लक्षात घेता तवसाळ ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली एकमुखी निवड सार्थ ठरवत तवसाळ ग्रामस्थ मंडळ स्थानिक, श्री देव स्वयंभू गजानन देवस्थान ट्रस्ट तवसाळ, तवसाळ महिला मंडळ यांच्या वतीने संयुक्त सत्कार करण्यात आला.
यावेळी “श्री देव स्वयंभू गजानन देवस्थान ट्रस्ट, तवसाळ”चे उपाध्यक्ष राजेश सुर्वे, विश्वस्त प्रदीप सुर्वे, सचिव अमोल सुर्वे, खजिनदार शाम गडदे, सहसचिव किरण गडदे, विश्वस्त प्रदीप सुर्वे, सुधाकर मयेकर, प्रकाश सुर्वे, जगदीश गडदे, प्रीतम सुर्वे, तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विज्ञान सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते निलेश सुर्वे उपस्थित होते. ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप सुर्वे यांनी अरविंद सुर्वे यांच्या अध्यक्षपदी निवडीमागचा उद्देश आणि त्यांच्याकडून ग्रामस्थांना असलेल्या अपेक्षा याबाबत थोडक्यात विषद केले.
ग्रामस्थांच्या सहकार्यानेच त्यांच्या अपेक्षपूर्तीसाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन अरविंद सुर्वे यांनी दिले.●