गणेश जयंती उत्सव
मोठ्या थाटात साजरा
गुहागर : जिथे सागरा शास्त्री नदी मिळते अशा संगमस्थानी, जय आणि विजयगडाच्या सानिध्यात असलेल्या गुहागर तालुक्यातील तवसाळ गावी स्वयंभु श्री गणेशाचा जन्मसोहळा भाव-भक्तीच्या पवित्र संगमात मोठ्या थाटात साजरा झाला. बुधवार २९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळपासून सुरू झालेला जयंती उत्सव मात्र सोमवार ३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. भाविकांनी स्वयंभु श्री गणेशाचे दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा आणि उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन तवसाळ ग्रामस्थ मंडळ स्थानिक/मुंबई, श्री देव स्वयंभु श्री गजानन देवस्थान ट्रस्ट यांनी केले आहे.
बुधवारी २९ जानेवारीला माघ शु. प्रतिपदेला शिवलीलामृत व गणेश ग्रंथाचे मिरवणुकीने वाजतगाजत मंदिरात आगमन झाले. तेव्हापासून पंचमीपर्यंत दररोज दिवसभर शिवलीलामृत ग्रंथाचे होत होते. ३० जानेवारीला लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. ३१ जानेवारीला स्थानिकांचे सुस्वर भजन, १ जानेवारीला दुपारी श्री गणेशाचा जन्मसोहळा साजरा झाला. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. रात्री श्री गणेशमूर्तीची रथयात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक गावभर फिरविण्यात आली.
रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत तालुक्यातील विविध मंडळांचे सुस्वर भजनाचे कार्यक्रम झाले. यात पालशेत, गुहागर खालचा पाट, आरे, गुहागर वरचा पाट या भजन मंडळातील मृदंगमणीनी रसिकांची मने जिंकली. २ जानेवारी रोजी ग्रंथ परायणाचा समारोप करण्यात आला. ३ जानेवारी रोजी सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी हळदीकुंकू समारंभ, संध्याकाळी स्थानिकांचे सुस्वर भजन, तर रात्री स्थानिक कलाकारांचे “लव्ह लव्हर जिंदाबाद” हे नाट्यपुष्प सादर करून श्री गणेश जयंती उत्सव कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.●