सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता
राहुल नार्वेकर होणार मंत्री
मुंबई ः विधानसभा निवडणुकीत भाजपचे सदस्य सर्वात मोठ्या संख्येने निवडून आले असताना काही महत्त्वाच्या लोकांना बाहेर ठेवण्यात आले असून. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता मंत्रीमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.
काही मंत्र्यांची बेताल वक्तव्ये, काही मंत्र्यांची सभागृहाला काळीमा फासणारी कृती, या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या धवल यशाला डाग लागू नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवी घडी बसवून तळापासून भाजपचेच राज्य करण्याच्या तयारीत नेते मंडळी आहेत.
मोठ्या जबाबदाऱ्या घेऊनही सध्या बाजूला असलले आणि नियमांची खडानखडा माहिती असलेले सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. बहुदा त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पहिल्यापासून मंत्रीपदासाठी इच्छुक होते. मात्र तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन कायद्याची जाण असलेल्या नार्वेकर यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी बसविले गेले. ते पद त्यांनी चांगल्या पद्धतीने निभावले. मात्र आता सरकार पूर्ण बहुमात असताना त्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून अनेक क्रांतीकारक निर्णय घेतले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना महायुतीने राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. शिवसेनेबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या लवादापुढे सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. ती सुनावणी नार्वेकर यांनी चाणाक्षपणे हाताळली. विरोधकांनी टीकेचा भडिमार केला. त्या टीकेने नार्वेकर अस्वस्थ झाले, पण विचलित झाले नाहीत. त्यांची त्यांच्या निकालाच्या पद्धतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ दिला नाही. मात्र २०२४ च्या निवडणुकीनंतर सरकारपूर्ण बहुमतात आहे. त्यामुळे नार्वेकर यांना अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून आता मंत्रीपदाची जबाबदारी देण्याचे घाटत आहे.
राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली तर अध्यक्षपदाबाबतचा प्रश्नही सुटण्यासारखा आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. चौदा वर्षांचा विरोधीपक्षाचा उपेक्षित कालावधी सोसून २०१४ मध्ये स्थापन झालेल्या युतीच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री होते. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महायुतीच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात मुनगंटीवारांकडून अर्थमंत्रीपद काढून घेत त्यांना वने, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री करण्यात आले. मात्र महायुतीच्या बहुमतात असलेल्या तिसऱ्या मंत्रिमंडळात मुनगंटीवार यांना बाहेरच ठेवण्यात आले. त्यामुळे ते नाराज आहेत. त्याचा राग म्हणून मुनगंटीवार यांनी उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशनामध्ये सरकार विरोधात रोखठोक भूमिका मांडत आपल्याच सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे आता भाजप सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांवर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, अध्यक्षपद तर मंत्र्यांपेक्षा वरचे पद आहे. अध्यक्ष म्हणून आपण अनेक क्रांतीकारक निर्णय घेतले आहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणाने काम करायचा प्रयत्न केला आहे. आता इतर कुठली जबाबदारी मिळणार असेल तर ती सुद्धा पार पाडेन, असे म्हणत राहुल नार्वेकर यांनी सुद्धा संभाव्य बदलाला नकळतपणे संमती दिली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची शक्यता फेटाळून लावली आहे. समोर नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका असताना वातावरण अस्थिर करण्याचे काम होईल, असे मला वाटत नाही, असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.