महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर डिव्हिजनमध्ये असणाऱ्या गिअर शॉपमधील ग्लिसन विभागात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या ग्रुपची पावसाळी सहलीची सुरुवात १९७४ साली झाली. यावर्षी २०२५ ला सहलीचे सलग ५१ वे वर्षे आहे. अपवाद फक्त करोना काळातील एक वर्ष. आज त्या ग्रुपमधील सर्व सहकारी ६५ ते ७५ या वयोगटातील सेवानिवृत्त असले तरी सर्वजण दरवर्षी पावसाळी सहलीला येतातच. सहलीच्या सुरुवातीला २५ जणांचा ग्रुप होता. आता १४ सहकारी आहेत. निसर्गनियमनुसार वयोमानपरत्वे माळेतल्या २५ मोत्यांपैकी १-१ मोती गळत असला तरी त्यांच्या स्मृतीला वंदन करत सहल निघतेच.–आम्ही महिंद्रकर
आला पावसाळा, चला सहलीला
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मित्रांसमवेत वर्षातून एकदा पावसाळ्यात सहलीला जाणे खूप आनंददायी, सुखद आणि उत्साहवर्धक असते. कारण निसर्गाकडे असणारी मनाला मोहवून टाकणारी प्रचंड ऊर्जा आपल्या शरीराचा ताबा घेते. या सहलीतून आपल्याला अविस्मरणीय आनंद तर मिळतोच; पण ते दोन दिवस बऱ्याच कालावधीसाठी आपल्याला संजीवनी देऊन जातात.
मित्रांबरोबर सहल आयोजित करताना आपली सर्वांची काही विशिष्ट उद्दिष्टे असतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यात बदल होत असतात. पण त्या फिरण्याची ओढ… त्याचे पूर्वनियोजन करताना उडणारी घाईगडबड… प्रत्येकाशी होणारी चर्चा… आणि उद्या निघायचेय ही हुरहूर अगदी जशी सुरुवातीला १९७४ ला होती तशीच आजही आहे. ती तसुभरही कमी झालेली नाही.
मन आणि शरीरही बहरते
” नेमेची येतो मग पावसाळा ” या उक्तीप्रमाणे पावसाळा आला की आम्ही सगळे मित्र सज्ज होतो. निसर्गात झाडाला फुटणाऱ्या पालवीप्रमाणे आमचे थकलेले मन आणि शरीरही अंकुरते. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरींबरोबर आमचेही नियोजन सुरू होते. हा उपक्रम सुरू होऊन इतका कालावधी लोटला आहे की कोणत्या वर्षी कुठे गेलो होतो हे विस्ताराने सांगणे कठीणच. यंदाचे २०२५ साल आमच्या या सहल उपक्रमाचे ५१ वे वर्षे आहे. अशा या सहलीचा इतिहास मनोरंजक आहेच. तो आपल्या सर्वांना सांगावा म्हणून हा लेखनप्रपंच.
मालेतले मोती गळाले
आम्ही सर्व महिंद्रकर… महिंद्रकर म्हणजे मुंबईत असणाऱ्या कांदिवली पूर्व येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर डिव्हिजन मध्ये असणाऱ्या गिअर शॉप मधील ग्लिसन विभागात काम करणारे सर्व सहकारी. आमच्या ग्रुपची पावसाळी सहलीची सुरुवात १९७४ साली झाली. यावर्षी २०२५ ला आमच्या सहलीचे सलग ५१ वे वर्षे आहे. अपवाद फक्त करोना काळातील एक वर्ष. आज आमच्या ग्रुपमधील सर्व सहकारी ६५ ते ७५ या वयोगटातील सेवानिवृत्त असून सर्वजण दरवर्षी पावसाळी सहलीला येतातच. सहलीच्या सुरुवातीला आमचा २५ जणांचा ग्रुप होता आता १४ सहकारी आहेत. आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे, गड किल्ले, धरणे, अभयारण्ये, रिसॉर्ट आधी निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे आयोजन केले आहे.
कुटुंबीयांचे सहकार्य
आम्ही सर्व सहकारी प्रोडक्शन विभागात कार्यरत होतो. सेवा काळात आमच्या पावसाळी सहलीसाठी दोन ते तीन दिवसांची रजा एकाच वेळी मिळणे कठीण होते. त्यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अगोदरच प्रोडक्शनचा प्लॅन करत असू. सहली यशस्वी होण्यामागे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. ही सहल आणि प्रोडक्शन सिस्टीम अडचणीत येऊ नये म्हणून आमच्यातले सहलीहून येणारे काही सहकारी रात्री दहा वाजता मुंबईत पोहोचूनही नाईट शिफ्टला कामावर जात असत. तसेच सहल काळात आमच्या कुटुंबीयांनी आम्हा या सहलीसाठी सहकार्य केले आहे. सहलीत आमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी काही सहकाऱ्यांच्या घरून प्रत्येक वर्षी विविध प्रकारचे पदार्थ करून दिले जात असत. कुटुंबीयांकडून मिळालेले हे प्रेम आणि सहकार्य आजही आम्हास मोलाचे वाटते.
सहली झाल्या, पण वाद नाही
आम्ही सर्वजण महिंद्रा कंपनीत काम करणारे सेवानिवृत्त सहकारी असलो तरी वैयक्तिक जीवनात कोणी कंपनीत कबड्डीपटू म्हणून नाव कमावले आहे, कोणी सामाजिक कार्यकर्ते, दूरदर्शनवरील मालिकांमध्ये काम करणारे, भजनी मंडळात गायक, वाद्यवृंदांमध्ये कुटुंबासह गाणारे, मन:शक्ती केंद्राचे साधक, बांधकाम व्यावसायिक, कथाकथन करणारे, तर सर्व धार्मिक विधी करणारे पुरोहितही आहेत.
आमच्या सहलीमध्ये असे कलाकार असल्यामुळे सहलीपूर्वी गाणी लिहिली जातात. ही गाणी शक्यतो विडंबनात्मक असतात; पण कोणी दुखावणार नाही अशी असतात. ही गाणी कोरसमध्ये गायली जातात. सकाळी भजने म्हटले जातात. आमच्या सहलीचे वैशिष्ट्य म्हणजे सहल काळात कोणताही अपघात, शारीरिक दुखापत व बाहेर कोणाशी भांडणतंटा झालेला नाही.
आठवण म्हणून हातभेट
रात्री सर्व सदस्यांची सभा घेऊन सर्व सदस्यांना बोलते केले जाते. यामध्ये सहलीबद्दल काय वाटते, वैयक्तिक जीवनातील अनुभव, कथाकथन आदी गोष्टी असतात व पुढील वर्षाच्या सहलीचे ठिकाण सर्वानुमते ठरवले जाते . सहलीत सहभागी प्रत्येक सभासदाला दरवर्षी एक आठवण भेट देऊन सन्मानित केले जाते. ती भेट देईपर्यंत तिची गुप्तता पाळली जाते. परतीच्या प्रवासात शिल्लक वस्तूंचा लिलाव केला जातो. यात लिलावापेक्षा मनोरंजन जास्त असते. सहलीच्या वेळी बाहेर ज्यांच्याशी संपर्क येतो त्यांना आमच्या ५१ सहलींबद्दल सांगितले तर आश्चर्य व आनंद वाटतो.
मित्रांचा सहवास : एक टॉनिक
सहलीमुळे सर्वांना एकमेकाचा सहवास लाभतो. त्यामुळे सर्वांमध्ये एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणून सुखदुःखामध्ये सर्वजण एकत्र येतो. मित्रांचा सहवास म्हणजे एक टॉनिक आहे. सणवार आले की आपण देव उजळवतो आणि मग ते अधिक तेज:पुंज लख्ख दिसू लागतात, तसेच आपल्या नात्याचे सुद्धा असते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपले नाते उजळवले तर या नात्यांची विणसुद्धा अधिक घट्ट होते आणि कायम नव्यासारखी चकाकत राहते.
आमच्या या सर्व एकावन्न पावसाळी सहली आनंददायी आणि यशस्वी झाल्याच; पण त्यातल्या काही सहली अगदी विलक्षण अनुभव देणाऱ्या होत्या.
डॉरमेटरीत पाणी
आम्ही लोणावळा येथे खूप वेळा गेलो. लोणावळा ते राजमाची परत लोणावळा असा पायी प्रवास करत ढग आणि धुके यासह चिंब भिजून पावसाचा मनमुराद आनंद लुटला. आनंदी घोड्यांवर स्वार होऊन आम्ही सर्वजण निसर्गसुंदर लोणावळा मनमुराद फिरलो आणि संध्याकाळी विश्रामगृहावर आलो. रात्रीचे जेवण आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम आटपून आम्ही सर्वजण डोर्मेटरी मध्ये झोपायला गेलो. बाहेर धूमधार पाऊस पडत होता. दिवसभर प्रवास आणि फिरून दमलेले आम्ही सर्वजण रात्रभर गाढ झोपलो. पण पूर्ण डोर्मेंटरी पाण्याने भरली होती. पहिल्या मजल्यावर पाणी कुठून आले, कसे आले याचा विचार करतच प्रत्येकजण कसातरी आपल्या बॅगेपर्यंत पोहोचला. पहातात तर सर्व बॅगा पाण्याने ओथंबल्या होत्या. त्या सहलीतील निवासस्थानाला नाव दिले.”पाणीदार विश्रामगृह!
बसमध्ये हरिनामाचा गजर
एका सहलीला लोणावळ्याला जात होतो. तो कालावधी नेहमीप्रमाणे पंढरपूरच्या वारीचा होता. भुशीडॅमच्या कॉर्नर जवळ गाड्यांचे चेकिंग चालू होते. चौकशीसाठी आमचीही गाडी अडवली होती. त्यातला एक पोलिस मिश्किलपणे म्हणाला वारीला जायचं सोडून पावसाळी पिकनिकला कसले जाता. आम्ही त्यांना काहीही प्रत्युत्तर न करता बसमधेच हरीनामाचा गजर सुरु केला. पोलिसांनी हसत, हसत आमच्या गाडीला ग्रीन सिग्नल दिला.
परमेश्वराने वाचवले!
एका वर्षी माणगाव भिरा येथील टाटाच्या विद्युत निर्मिती केंद्राजवळ सहलीला गेलो होतो. तेथील नदीत पाणी कमी होते म्हणून आम्ही सर्वजण नदीच्या पात्रात खडकावर जेवणासाठी बसलो असता एक वयस्कर गृहस्थ आले आणि त्यांनी इथे बसू नका धरणाचे पाणी सोडलं तर मोठा लोंढा येईल असे सांगितले. आम्ही लगेच उठून किनाऱ्यावर आलो आणि दहा मिनिटातच पाण्याचा असा लोंढा आला की तो पाहून आमचे हातपाय थरथरायला लागले. त्या सद्गृहस्थाचे आभार मानण्यासाठी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही सापडले नाहीत. कदाचित परमेश्वरानेच त्यांना आमच्यासाठी पाठवले असेल. आजही तो प्रसंग आठवला तरी एक अनामिक भीतीची लहर शरीरातून गेल्यासारखी वाटते.
चार तास बस पाण्यात
एक वर्षी आम्ही लक्झरी बसने महाबळेश्वरला चाललो होतो. खूप पाऊस होता आमची बस नागोठण्याला पोहोचली तेव्हा संपूर्ण नागोठणे शहर पाण्याखाली होते. आमची बस एकाच ठिकाणी चार तास पाण्यात उभी होती. रात्री उशिरा आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो. तिथे सुद्धा खूप पाऊस होता. आम्हाला लॉजबाहेर पडणे देखील मुश्किल झाले. पावसाळा म्हणजे काय ते आम्ही तिथे अनुभवले.
स्वामींची कृपा
एक आठवण जव्हारची आहे. आम्ही जो धबधबा पाहणार होतो तो पलीकडच्या डोंगरावर होता आणि आम्ही अलीकडच्या डोंगरावरून तो पाहणार होतो. दोन डोंगरांच्या मध्ये मोठी दरी होती. लहानशा रस्त्यावरून जव्हारच्या धबधब्यावर जाताना आमची मिनिबस चिखलमिश्रित गवतावरून घसरली आणि चालकाचा मिनिबसवरील ताबा गेला. पण स्वामीच्या कृपेनें दरीपासून बस हळूहळू दहा फुटावर थांबली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.
एकावन्न सहली, एकावन्न अनुभव
आमच्या पावसाळी सहलींतील अशा काही मोजक्याच प्रसंगांकडे मागे वळून पहिले तर वाटते की कोणती तरी अज्ञात शक्ती आमच्या पाठीशी उभी राहून आमचे रक्षण करत होती. असे आनंदादायी, मजेशीर आणि जीवावर बेतलेले प्रसंग आम्ही सर्व सहकाऱ्यांनी मागील एकावन्न पावसाळी सहलीमध्ये अनुभवले. आता आम्ही सर्वजण आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत की आमच्या सहलींच्या रेशमी वस्त्रावरील जरतारी किनारीसारखे असणारे हे अनुभव आठवत पुढील शांत, संयत सहलींचे नियोजन करणे आणि त्यांचा भरभरून आनंद घेणे.
आमचा असा सहलीचा काळ भरगच्च कार्यक्रमामुळे कधी संपतो ते कळतच नाही. एका सहलीची ऊर्जा आम्हाला पुढील सहलीपर्यंत पुरतेच आणि पुढील सहलीची ओढ लावते.