Friday, April 18, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeकोकणकाताळे ग्रामपंचायत इमारत झोकात

काताळे ग्रामपंचायत इमारत झोकात

काताळे ग्रामपंचायतीच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. विनय नातू. सोबत व्यासपीठावर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर. सरपंच प्रियांका सुर्वे आणि उपस्थित मान्यवर.

माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच प्रियांका सुर्वे यांच्या हस्ते छानदार उद्घाटन

गुहागर : गुहागर तालुक्यातील काताळे, तवसाळ, तवसाळ खुर्द या तीन महसुली गावांचा समावेश असणाऱ्या काताळे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सोमवार ३ मार्च २०२५ रोजी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सौ. प्रियांका सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्कालीन आमदार डॉ. विनयजी नातू यांच्या विशेष प्रयत्नाने सन २०१० मध्ये पडवे ग्रामपंचायतीच्या पडवे आणि काताळे अशा २ ग्रामपंचायती निर्माण झाल्या. ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर ज्या महसूल गावाची लोकसंख्या जास्त त्या गावचे नाव ग्रामपंचायतीला देण्यात यावे या नियमानुसार नवीन ग्रामपंचायतीला काताळे हे नाव मिळाले आणि काताळे गावातील सर्व ग्रामस्थानी मोठ्या मनाने ग्रामपंचायत कार्यालयाला विनामोबदला जागा आणि विनामोबदला इमारत तयार करून दिली. त्यानंतर १५ वर्षानी काताळे ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निलेश सुर्वे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने या ग्रामपंचायतीला 22 लाखाचा निधी जिल्हा नियोजन जनसुविधा योजनेतुन प्राप्त झाला. अधिक ३ लाख रुपये ग्रामनिधी असे 25 लाख खर्च करून दिमाखदार इमारत काताळे महसुली गावात उभी राहिली. विशेष म्हणजे कै. जयंत यशवंत जुवेकर यांनी या ग्रामपंचायतीसाठी कोणताही मोबदला न घेता ४ गुंठे जागा दिली आहे.
विद्यमान सरपंच सौ. प्रियांका सुर्वे, उपसरपंच प्रसाद सुर्वे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी यांनी या ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी विशेष पाठपुरावा केला होता.

काताळे ग्रामपंचायतीच्या वस्तूचे फीत कापून उद्धाटन करताना सरपंच सौ. प्रियांका सुर्वे. सोबत माजी आमदार डॉ. विनय नातू आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर

 

खरे तर या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्याचे निश्चित होते. पण त्याच दिवशी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाल्याने स्वतः मंत्रिमहोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
त्यामुळे माजी आमदार डॉ. विनयजी नातू यांनी श्रीफळ वाढवून, सरपंच सौ. प्रियांका सुर्वे यांनी फीत कापून; तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांनी नामफलकाचे अनावरण करून एकत्रितपणे काताळे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

काताळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश सुर्वे यांनी प्रास्ताविकामध्ये पडवे ग्रामपंचायतीचे विभाजन, काताळे ग्रामपंचायतीची स्थापना ते काताळे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होईपर्यंतचा सर्व इतिहास उपस्थितांसमोर ठेवला. यावेळी या १५ वर्षाच्या कालखंडामध्ये काताळे ग्रामस्थानी विनामोबदला स्वखर्चाने बांधून दिलेली इमारत आणि १५ वर्षे वापरावयास दिलेले कातळे बारस्कर वाडीचे सभागृह याबद्दल सुद्धा ऋण व्यक्त केले.
सभागृह लवकरच
या ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी एका भव्य अशा सभागृहाची आवश्यकता असल्याचे सरपंच सौ. प्रियांका सुर्वे यांनी मनोगत व्यक्त करताच काताळे गावचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांनी लवकरच सरपंच महोदयांची ही मागणी आपण पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
ग्रामपंचायत मार्गदर्शक केंद्र बनेल

ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या उदघाटनाला मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना डॉ. विनय नातू.

माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कै. जयंत यशवंत जुवेकर यांनी विनामोबदला दिलेल्या जमिनीमध्ये दिमाखदारपणे उभी राहिलेल्या या इमारतीबद्दल सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे कौतुक करत असतानाच ही ग्रामपंचायत इमारत पंचक्रोशीतील एक मार्गदर्शक केंद्र बनेल, रोजगाराचे केंद्र बनेल, रोजगार निर्मितीचे केंद्र बनेल, पर्यटकांसाठी मदतनीस म्हणून काम करून पंचक्रोशीत पर्यटनाच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करतील असा विश्वास व्यक्त केला.
मान्यवरांची मांदियाळी
यावेळी व्यासपीठावर जागामालक कै. जयंत यशवंत जुवेकर यांचे नातू जयदीप जुवेकर, गुहागर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सचिन ओक, काताळेचे माजी सरपंच अशोक पवार, शर्वरी कुरटे, संदीप जोशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष उत्तम पवार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुभाषशेठ कोळवणकर, व्हाईस चेअरमन रमेश कुरटे, माजी चेअरमन विजय मोहिते, तंटामुक्तीचे ७ वर्ष नेतृत्व करणारे प्रदीप सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश गडदे, तालुका खरेदी विक्री संघ संचालक शाम गडदे, पडवे सरपंच मुजीब जांभारकर, जांभारी सरपंच वनिताताई डिंगणकर, पोलीस पाटील सचिन रसाळ, तवसाळ खुर्द शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश गडदे, तलाठी सचिन परदेसी, ठेकेदार अमोल पाटील, काताळे मरीन सिंडीकेटचे इंद्रनील भाटकर, ॲड. अपुर्वाताई बारगोडे, प्रसिद्ध उद्योजक अरुणशेठ गांधी, संदिप साळवी,आरोग्य सेविका कील्लेकर याचबरोबर कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, प्रभाग समिती अध्यक्ष, ग्रामसंघ अध्यक्ष, बचत गटाचे सर्व प्रतिनिधी,सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, कार्यक्षेत्रातील तीनही महसूल गावांमधील गावचे अध्यक्ष, वाडी प्रमुख, महिला मंडळ अध्यक्ष आदीसह बहुसंख्येने ग्रामस्थ बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
प्रमुख अधिकाऱ्यांबद्दल नाराजी
या ग्रामपंचायतीच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अधिकृतपणे निमंत्रणे दिलेले असतानाच गुहागर तालुक्याचे गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व सर्व शासकीय तालुकास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. ग्रामपंचायतीने निमंत्रण पत्रिकेमध्ये आपले बहुमानाने नाव टाकून, प्रत्यक्ष जाऊन आपल्याला निमंत्रण पत्रिका दिलेली असताना हे सर्व शासकीय अधिकारी या ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले नाही किंवा त्यानी आपला कोणी प्रतिनिधी पाठवला नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायती सारख्या शासकीय इमारतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसाल तर याबाबत आपल्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी डॉ. विनय नातू यांनी सांगितले. आपण शासनाचा पगार घेता आणि वैयक्तिक कोणाचे जर काम करत असाल तर याची गंभीर दखल यापुढे घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.
नाटेकरांचे नाव नसल्याची खंत
तालुक्यात फिरत असताना अनेक विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचे फलक पाहतो यावरती फक्त एकाच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाचे नाव पहावयास मिळते. मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद भूषवणाऱ्या महेश नाटेकर यांचे नाव कुठेच दिसत नसल्याची खंत व्यक्त करत जिल्हा परिषदेला फक्त एकच अध्यक्ष झाला का, असा सवाल डॉक्टर नातू यांनी उपस्थित केला.
दिलीप गडदे यांची आठवण
या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील एक उत्तुंग असे राजकीय व्यक्तिमत्व कै. दिलीप गडदे यांची आठवण काढत असतानाच दिलीप गडदे आणि मी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी आमचे ऋणानुबंध हे राजकारणाच्या पलीकडे असल्याचे सांगत काताळे ग्रामपंचायतीच्या इथून पुढच्या कारभारास अनेक शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य आणि पडवे आणि काताळे ग्रामपंचायतीच्या विभाजन कामी विशेष भूमिका बजावणारे मधुकर अजगोलकर यांनी या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या भव्य दिव्य अशा उद्घाटन कार्यक्रमासाठी काताळे, तवसाळ, तवसाळ खुर्द महसूल गावातील सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय सहकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी घेतलेली मेहनत, कार्यक्रमाला असणारी कार्यक्षेत्रातील सर्व मतदार बंधू भगिनींची उपस्थिती आणि हळदी कुंक कार्यक्रमांसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या सर्वांचे सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे यांनी ऋण व्यक्त केले.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध