Friday, April 18, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeकोकणतवसाळ गावी भावभक्तीचा महापूर

तवसाळ गावी भावभक्तीचा महापूर

ग्रामदेवता महामाईच्या मंदिराचा
जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा

मुंबई ः रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या गुहागर तालुक्यातील तवसाळ गावच्या श्री देवी महामाई-सोनसाखळी ग्रामदेवतेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे लोकार्पण आणि कलशारोहण सोहळा शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०१५ पासून सुरू होत आहे. १७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त जिल्ह्यातील आणि देवीच्या कृपादृष्टीची प्रचीती आलेली राज्यातील मोठ्या संख्येने येणार असल्याने तवसाळ गावी पुढील चार दिवस भाव-भक्तीचा महापूर ओसंडून वाहणार आहे.

निसर्गसान्निध्यात असलेले श्री देवी महामाई सोनसाखळीचे मंदिर अतिप्राचीन आहे. आजूबाजूला गर्द झाडी, मंदिराच्या पुढे माडांचे बन बाजूने खळ्ळ्ळ् ख्ळ्ळ्ळ् करत वाहणारी नदी उन्हाळ्यात पाणवठ्यावर येणारी गुरे, पक्षांचा किलबिलाट आणि निरवशांततेत भाविक मंदिरात आल्यानंतर आजूबाजूच्या डोंगरकपारीत घुमणाऱ्या घंटेच्या नादाच्या लहरी, असे मनाला प्रसन्नता देणारे वातावरण कायम आहे. या मंदिराला ब्रिटिश सरकारची सनद होती. मात्र जमाना बदलत गेला. जग जवळ येत चालले. दळणवळणाच्या सुविधा वाढत गेल्या. जिकडे-तिकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मंदिरांची सुधारणा होऊ लागली. मग त्यात तवसाळ गाव मागे कसे राहील?
सन १९९३ च्या सुमारास तवसाळच्या स्वयंभु श्री गणेशाच्या इतिहासकालीन मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्या मंदिराचा हा ग्रामस्थांच्या माहितीतील तिसरा जीर्णोद्धार. हे मंदिर जयगड आणि विजयगड पाहऱ्यात आणि अरबी समुद्राच्या किनारी असल्याने त्या मंदिरालाही पर्यटनाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. त्यानंतर तवसाळ ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांनी श्री देवी महामाई-सोनसाखळी, त्रिमुखी, सोमजाय आणि रवळनाथ महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा मनोदय व्यक्त केला. त्याला भाविकांनी साथ दिली. निधी जमत गेला. मंदिर जुन्या जमान्यातले कौलारू होते. आता काँक्रीटची इमारत झाली आहे. चार-पाच वर्षानंतर या मंदिराचा शुक्रवारी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी जीर्णोद्धार होत आहे.

अध्यक्षांचे आवाहन

श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा कलशारोहण सोहळा मिती माघ कृ. २ ते ५ शके १९४६ शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०२५ ते १७ फेब्रवारी २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. सर्व भक्तगणांनी या सर्व कार्यक्रमास आपल्या माहेरवाशीणी, कुटुंबिय, मित्रपरिवार व सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व “श्री देवी महामाई सोनसाखळी”च्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री देवी महामाई सोनसाखळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मोहन यशवंत गडदे यांनी केली आहे.

विकासरूपी बोला नवस
मंदिर परिसरात अजूनही बऱ्याच सुधारणा व्हावयाचा आहेत. त्यासाठी निधीची गरज आहे. हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी श्री देवी महामाई सोनसाखळी भाविकांना तिच्या कृपाशीर्वादाची प्रचीती देत राहील. देवीला कोंबडी-बकऱ्याचा नवस बोलण्याऐवजी भाविकांनी निधीच्या रुपात वा मंदिर परिसराच्या एखाद्या भागाचा विकास करून नवसफेड केली तर संपूर्ण जीर्णोद्धाराचा पंचक्रोशीतील भाविकांचा आणि ग्रामस्थांचा मनोदय निश्चितच तडीस जाईल आणि जीर्णोद्धाराचा वसा सफल संपूर्ण होईल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

श्री देवी महामाई सोनसाखळीच्या
मंदिराचा जीर्णोद्धार आणि
कलशारोहणानिमित्त होणारे कार्यक्रम

शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५
★सकाळी १० ते २ वा. : कलश मिरवणूक
★महामाई सोनसाखळीच्या गादीवरून
श्री. राजेश रमेश सुर्वे यांचे घर ते
महामाई सोनसाखळी मंदिर.
★दुपारी २ वा. : महाप्रसाद
★रात्री ९ वा. : स्थानिकांची व निमंत्रितांची भजने

शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५
★सकाळी ९ ते १२ वा. : षोडशोपचारे पूजन,
देवीला रूपा लावणे

★दुपारी १२.३० ते २ वा. : कलशारोहण सोहळा
★दुपारी २ वा. : महाप्रसाद
★सायं. ७ ते १० वा. : स्थानिक व पंचक्रोशीतील
ग्रामस्थांची सुस्वर भजने
★रात्री १० वा. : भजनांचा जंगी सामना
डबल बारी
दत्तप्रासादिक भजन मंडळ, भांडुप
बुवा : श्री. भगवान लोकरे
विरुद्ध
श्री पावणादेवी भजन मंडळ,
धालवली, ता. देवगड
बुवा : श्री. प्रमोद हर्याण
रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५
★सकाळी १० ते दु. २ वा. : देवस्थापना,
होमहवन, दृष्ट ओवाळणी
★दुपारी २ वा. : महाप्रसाद
★सायं. ७ ते १० वा. : पंचक्रोशीतील
ग्रामस्थांची सुस्वर भजने
★रात्री १० वा. : निमंत्रितांची भजने
सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२५
★सकाळी १० ते दु. १ वा. : श्री सत्यनारायणाची
महापूजा, महाआरती
★दुपारी २ वा. : महाप्रसाद
★सायं. ७ ते १० वा. : पंचक्रोशीतील
ग्रामस्थांची सुस्वर भजने
★रात्री १०.३० वा. : तवसाळ पंचक्रोशीतील
बहुरंगी नमन●

 

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध